महानगरपालिकेचा आयुक्त १० लाखांची लाच घेताना रंगेहात अटक
जालना दि. १६ ऑक्टोबर – शहर महानगरपालिकेचा आयुक्त संतोष खांडेकर याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दहा लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे. या घटनेमुळे जालना शहरासह प्रशासन वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जालना शहर महानगरपालिकेतील एका कंत्राटदाराचे बांधकामाचे बिल बराच काळ अडकले होते. त्या बिलाच्या मंजुरीसाठी आयुक्त संतोष खांडेकर याने संबंधित कंत्राटदाराकडून दहा लाख रुपयांची लाच मागितल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती. तक्रारीची खातरजमा केल्यानंतर लाचलुचपत विभागाने नियोजनपूर्वक सापळा रचला.
ठरल्याप्रमाणे कंत्राटदाराने लाच रक्कम आयुक्ताला दिली असता, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ कारवाई करत आयुक्त खांडेकर याला दहा लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. अटक झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी त्यांच्या मोतीबाग येथील शासकीय निवासस्थानाची झडती घेतली. झडतीदरम्यान काही महत्त्वाचे कागदपत्रे आणि पुरावे हस्तगत झाल्याची प्राथमिक माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

या घटनेनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आयुक्त खांडेकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. शहराच्या विकासासाठी जबाबदारी असलेल्या सर्वोच्च अधिकाऱ्यालाच लाच घेताना पकडण्यात आल्याने जनतेत संतापाची भावना व्यक्त होत आहे. जालना शहरात या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू असून, पुढील चौकशी आणि कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.