शहर पोलिसांची नशाविरोधी मोहीम : एमपी, गुजरात मॉडेल ड्रग सिंडिकेटचा पर्दाफाश
छत्रपती संभाजीनगर : शहरात अंमलीपदार्थांची विक्री, साठा व वितरण यावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी पोलीस आयुक्त प्रविण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस दलाने हाती घेतलेल्या मोहीमेअंतर्गत आणखी एक मोठी कारवाई करत बाहेर राज्यातील टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. या कारवाईत मध्य प्रदेश आणि गुजरात राज्यातून कोडीन सिरपचा मोठा साठा पुरवणाऱ्या टोळीतील चार आरोपींना अटक करून तब्बल १८,३६० बाटल्या कोडीन सिरपसह होंडाई कार, मोबाईल हॅन्डसेट असा एकूण ७७ लाख ४४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
प्रविण पवार यांनी पोलीस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यापासून अंमलीपदार्थांच्या विक्रीविरुद्ध शून्य सहनशीलतेची भूमिका घेतली असून, त्यांच्या आदेशानुसार शहरातील सर्व पोलीस ठाणे, गुन्हे शाखा आणि अंमलीपदार्थ विरोधी पथक (ANC) यांना कडक कारवाईचे निर्देश दिले होते. या आदेशानुसार वर्ष २०२५ मध्ये आतापर्यंत २६० गुन्हे NDPS कायद्यांतर्गत दाखल करण्यात आले असून ४०० आरोपींना अटक करण्यात आली आहे. यातून तब्बल २ कोटी ३७ लाख रुपयांचा अंमलीपदार्थ जप्त करण्यात आला आहे.
अंमलीपदार्थ पुरवठ्याच्या जाळ्याचा शोध घेताना पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार मागील महिन्यात वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीत १२ सप्टेंबर रोजी राईटस कंपनीच्या कोडीन घटक असलेल्या औषधी सिरपच्या २,५०४ बाटल्यांसह १२ लाख ४३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. या प्रकरणात ४१ आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले होते.

या तपासाचा धागा पुढे नेत गुन्हे शाखेच्या पथकाला आणखी माहिती मिळाली. त्यानुसार दि. ९ ऑक्टोबर २०२५ रोजी बेगमपुरा पोलीस ठाण्यात कल्पेश चंदुलाल अग्रवाल (वय ३८, रा. पदमनाभनगर, धुळे), सय्यद नबी सय्यद लाल (वय ३७, रा. जोगेश्वरी, MIDC वाळूज) आणि ज्ञानेश्वर मनोहर यादव ऊर्फ माऊली (रा. जयभवानी नगर) या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान उघड झाले की, धुळे येथील आरोपी कल्पेश अग्रवाल याला मध्य प्रदेशातील दुर्गेश सिताराम रावत (वय ५४, रा. श्रीयांशनाथ अपार्टमेंट, इंदौर) आणि गुजरातमधील धर्मेंद्र ऊर्फ गोपाल खेमचंद प्रजापती (वय ३२, रा. स्नेहदीप सोसायटी, वेजलपूर, अहमदाबाद) यांनी मोठ्या प्रमाणात कोडीन सिरपचा साठा पुरवला होता.
पोलीस आयुक्त प्रविण पवार यांच्या आदेशानुसार गुन्हे शाखेच्या तीन विशेष टीम धुळे, इंदौर आणि अहमदाबाद येथे रवाना झाल्या. या टीमनी धुळे व इंदौर येथून १८,३६० बाटल्या कोडीन सिरप जप्त करत दुर्गेश रावत व धर्मेंद्र प्रजापती या दोघांना अटक केली. या दोन्ही आरोपींना न्यायालयासमोर हजर केल्यावर न्यायालयाने २१ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी (PCR) मंजूर केली असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त प्रविण पवार, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) रत्नाकर नवले आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) संपत शिंदे यांच्या थेट मार्गदर्शनाखाली पार पडली. प्रत्यक्ष कारवाई पोलीस निरीक्षक संभाजी पवार, तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक रविकांत गच्चे यांच्या नेतृत्वाखाली ज्ञानेश्वर अवघड, संजय बहुरे, विनायक शेळके, पोउपनि संदीप काळे, अर्जुन कदम, सफौ. दिलीप मोदी, पोह. प्रकाश गायकवाड, अशरफ सय्यद, अमोल शिंदे, नवाब शेख, पो.अं. सागर पांढरे या कर्मचाऱ्यांनी केली.
या धाडसी कारवाईमुळे शहरात अंमलीपदार्थांच्या विरोधातील पोलिसांची पकड अधिक मजबूत झाली आहे. बाहेर राज्यातून येणारा नशेचा पुरवठा रोखण्यात यश मिळाल्याने नागरिकांत पोलीस दलाबद्दल समाधान आणि कौतुकाची भावना व्यक्त होत आहे. पोलीस आयुक्त प्रविण पवार यांच्या नेतृत्वाखाली शहर पोलिसांनी घेतलेली ही मोहीम आगामी काळातही अंमलीपदार्थविरोधी लढ्यात एक आदर्श ठरेल, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे.