गोळ्या झाडल्या तरी चालतील, पण आरक्षण हवेच – जरांगे पाटील

गोळ्या झाडल्या तरी चालतील, पण आरक्षण हवेच – जरांगे पाटील

मुंबई, दि. २९ ऑगस्ट :  मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या काही महिन्यांपासून ठाम भूमिका घेत राज्यभर आंदोलनाचे रणशिंग फुंकणारे मनोज जरांगे पाटील अखेर मुंबईत दाखल झाले. आज सकाळी दहा वाजता त्यांनी आझाद मैदानावर आमरण उपोषणास प्रारंभ केला. उपोषणास सुरुवात करताना त्यांनी सरकारला थेट इशारा देत स्पष्ट शब्दांत सांगितले की, माझ्यावर गोळ्या झाडल्या तरी चालतील, पण आरक्षण मिळाल्याशिवाय मी माघार घेणार नाही.

      आझाद मैदानावर पोहोचताच त्यांनी मोठ्या संख्येने जमलेल्या आंदोलनकर्त्यांना शिस्तबद्ध व शांततेने आंदोलन करण्याचे आवाहन केले. मुंबईकरांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची काळजी घेणे ही सर्वांची जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सरकारने उपोषणासाठी मैदान उपलब्ध करून दिल्याने संयमाने व अनुशासनबद्ध पद्धतीने लढा दिला पाहिजे, असेही ते म्हणाले. त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना उद्देशून आरक्षण हाच एकमेव मुद्दा असून त्यापलीकडे कोणत्याही वादात अथवा उपद्रवात गुंतायचे नाही, असा स्पष्ट संदेश दिला.

      या वेळी जरांगे पाटील यांनी आंदोलनकर्त्यांना दहा ठोस सूचना दिल्या. कोणत्याही प्रकारचा गोंधळ, दगडफेक किंवा जाळपोळ होऊ नये, रस्ते व वाहतूक सुरळीत ठेवावी, पोलिस प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे, दिलेल्या मैदानातच मुक्काम करावा, वाहनं फक्त अधिकृत पार्किंगमध्ये उभी करावीत, मुंबईकरांना त्रास होणार नाही याची खबरदारी घ्यावी, सोडण्यासाठी आलेल्यांनी परत जावे, इतर वाद टाळून फक्त आरक्षणाच्या मागणीवर लक्ष केंद्रीत करावे आणि आरक्षण मिळाल्याशिवाय मुंबई सोडायची नाही, अशा कठोर सूचना त्यांनी दिल्या.

      मनोज जरांगे पाटील यांनी यापूर्वीही राज्यभर उपोषण, मोर्चे व दौरे करून मराठा समाजाला मोठ्या प्रमाणात संघटित केले होते. अनेक ठिकाणी समाजबांधव मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते. मात्र, मुंबईतील आमरण उपोषणाला ऐतिहासिक महत्त्व असल्याचे मानले जात आहे. राज्य सरकारने या आंदोलनास परवानगी दिल्यानंतर हजारो आंदोलक आझाद मैदानावर दाखल झाले असून संपूर्ण महाराष्ट्राची नजर या आंदोलनाकडे लागली आहे.

     सरकारसोबत यापूर्वी झालेल्या चर्चेचा उल्लेख करताना जरांगे पाटील यांनी सांगितले की, सरकारने यावेळी सहकार्य केले असून त्याचे कौतुकही करण्यात आले आहे. तथापि, आता अंतिम लढा मुंबईतूनच दिला जाणार असून आरक्षण मिळेपर्यंत संघर्ष मागे हटणार नाही, असा ठाम निर्धार त्यांनी जाहीर केला.