मानवतेच्या रणांगणात नवी भर : एम. ए. शकील यांची IHRC स्वयंसेवक पदावर नियुक्ती
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद ): मानवाधिकारांच्या हक्कासाठी लढणाऱ्या इंटरनॅशनल ह्यूमन राइट्स कमिशनने (IHRC Corporation) आपल्या विशेष मोनिटरिंग मिशनचा विस्तार करत छत्रपती संभाजीनगरात एका भव्य सत्कार सोहळ्याचं आयोजन केलं. या सोहळ्यात IHRC इंडिया कमिशनर श्री. चिश्ती अझहरुद्दीन यांनी एम. ए. शकील यांना IHRC च्या स्वयंसेवकपदी अधिकृत नियुक्ती देत त्यांच्या सेवाभावी प्रवासाला नवी उंची देणारा मानाचा मुजरा केला.
या वेळी शकील यांच्या हाती अधिकृत प्रमाणपत्र आणि ओळखपत्र सोपवताना अझहरुद्दीन यांनी मानवतेसाठी काम करण्याची त्यांची तयारी आणि बांधिलकीची प्रशंसा केली. ही नियुक्ती IHRC चे सेक्रेटरी जनरल आणि पीसमेकर प्रो. रफाल मार्सिन वासिक तसेच आंतरराष्ट्रीय संबंध संचालक डेव्हिड झाब्लोव्स्की यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सोहळ्याला डॉ. शामशेर खान आणि डॉ. आरिफ भट यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली.
IHRC चे स्पेशल मोनिटरिंग मिशन समाजातील अन्याय, महिला अत्याचार, हिंसाचार, अन्यायकारक वागणूक आणि वंचित घटकांच्या समस्येविरुद्ध लढण्यासाठी ओळखलं जातं. कायदेशीर मदत, शैक्षणिक उपक्रम आणि सामाजिक न्यायासाठी हे मिशन सतत आग्रही आहे. या मैदानात पाऊल ठेवणाऱ्यांना केवळ नियुक्ती मिळत नाही, तर समाजातील विषमता, हिंसा आणि अन्यायाला छातीठोक प्रत्युत्तर देण्याची जबाबदारीही मिळते.
कार्यक्रमात बोलताना कमिशनर चिश्ती अझहरुद्दीन यांनी मानवतेच्या सेवेचं महत्व अधोरेखित करत सांगितलं की, “IHRC चे ध्येय म्हणजे शांतता, न्याय आणि समानतेचा लढा. युवकांनी या मोहिमेत सहभागी व्हावं, हीच काळाची मागणी आहे.” त्यांच्या या संदेशाला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
समारोप क्षणी एम. ए. शकील यांना शुभेच्छांचा वर्षाव करत उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या सामाजिक बांधिलकीचं कौतुक केलं. मानवाधिकार रक्षणाच्या या लढ्यात शकील यांची उभारी आणि तयारी पाहून मानवतेच्या बाजूने आणखी एक मजबूत हात उभा राहिल्याची भावना संपूर्ण सभागृहात जाणवत राहिली.