फार्महाऊसवरील जुगार अड्ड्यावर छापा : २५ लाख कॅशसह एकुण १,८१,१२०००/- ₹ चे साहित्य जप्त; पोलिसांनी जुगाऱ्यांवर उपकार केल्याची परिसरात चर्चा!!

औरंगाबाद : औरंगाबाद ग्रामीण अंतर्गत पोलीस स्टेशन शिल्लेगाव परिसरातील पिंपळगाव दिवशी येथील दगडा फार्महाऊसवर चालू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी रात्री ०३:३० वा. छापा घालून जुगार खेळणारे व खेळविणारे ७ जुगाऱ्यांना झन्ना-मन्ना नावाचा जुगार खेळताना रंगेहात पकडले. त्यांचेकडून २५ लाख ६० हजार रुपये रोख रकमेसह ५ चार चाकी वाहने, ताशपत्ते, ७ मोबाईल हॅंडसेट्स असे साहित्य एकूण एक कोटी ८२ लाख १२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फत शिल्लेगाव हद्यीतील दगडा फार्महाऊस येथे जुगार अड्डा चालु असल्याची माहिती मिळाली. त्यावर त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर रेंगे यांना त्यांचे पथकासह तात्काळ मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी छापा मारण्याच्या सुचना दिल्या. पोलीस निरीक्षक रामेश्वर रिंगे यांनी गंगापूर चे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश बेले यांना सोबत घेऊन तसेच आपले सहकारी पो.उप.नि. प्रदीप ठुबे, पोलीस अंमलदार लहु थोटे, श्रीमंत भालेराव, किरण गोरे, गणेश गांगवे, विजय धुमाळ, उमेश बकले, ज्ञानेश्वर मेटे, आनंद घाटेश्वर यांचे सह कसाबखेडा फाटा ते देवगाव रंगारी जाणारे रोडवरील मनोजकुमार दगडा यांचे दिवशी शिवारातील शेतातील फार्महाऊसवर चालू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा घालून ताश पत्त्याचे सहाय्याने कॅश पैसे लावून झन्ना- मन्ना नावाचा जुगार खेळणारे व खेडविणारे ७ जुगाऱ्यांना रंगेहात पकडले. पकडलेल्या जुगाऱ्यांची नावे अशी;
१) पुनमसिंग सुनील ठाकुर वय ३३ वर्ष रा. रांजणगाव शेणपपुंजी ता.जि. औरंगाबाद
२) गणेश रावसाहेब पोटे वय २८ वर्ष रा. नागेश्वरवाडी, औरंगाबाद
३) कुणाल दिलीपकुमार बाकलीवाल वय ३७ वर्ष रा. शहागंज, औरंगाबाद
४) अभिषेक वसंतकुमार गांधी वय ३६ वर्ष रा.चिकलठाणा औरंगाबाद
५) संदीप सुधीर लिंगायत वय ४७ वर्ष रा. बन्सीलाल नगर औरंगाबाद
६) विशाल सुरेश परदेशी वय ३३ वर्ष रा पदमपुरा, औरंगाबाद
७) मनोजकुमार फुलचंद दगडा वय ४६ वर्ष रा. सिडको एन-९ छायानगर, औरंगाबाद.
पोलिसांनी जुगाऱ्यांचे ताब्यातुन २५,६०,०००/- रुपये रोख, ताशपत्त्यांसह जुगाराचे साहित्य जप्त केले. त्यासोबतच जुगाऱ्यांची ५ चार चाकी वाहने, ७ मोबाईल हॅन्डसेट ही जप्त केले. असा एकुण १ कोटी ८१ लाख १२ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.
आरोपींविरुद्ध पोलीस स्टेशन शिल्लेगाव येथे अपराध क्रमांक ३४६/२०२२ कलम ४ आणि ५ महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना जामीन वर सोडण्यात आले आहे.
पोलिसांनी जुगाऱ्यांचे जवळील आणि झन्ना मन्ना जुगाराचे डावावरील रोख रक्कम तर जप्त केलीच परंतु जुगाऱ्यांची ५ चार चाकी वाहने आणि ७ मोबाईल हँडसेट ही जप्त केले. मोबाईल हँडसेट आणि चार चाकी वाहने का जप्त करण्यात आली? जुगार यांनी कार आणि मोबाईल हँडसेट जुगाराचे डावावर लावले होते का? गावावर लावले नसतांना कार आणि वाहने जप्त केलीच तर जुगाऱ्यांचे अंगावरील कपडे व इतर साहित्य का जप्त करण्यात आले नाही? त्यासोबतच दगडा फार्म हाऊसला का जप्त करण्यात आले नाही? त्या फार्म हाऊसवरील इतर साहित्य ही का जप्त करण्यात आले नाही? याबाबत जुगाऱ्यांवर असे उपकार का करण्यात आले? याविषयी परिसरात चर्चांना उधाण आले आहे.